पॅन कार्डधारकांना 31 मार्च 2023 पूर्वी पॅन आणि आधार लिंक करणे आवश्यक आहे. प्राप्तिकर विभागाने यासंदर्भात अनेकदा चेतावणी दिली आहे. प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी शुल्क निश्चित करण्यात आले आहे, त्यानंतरच पेमेंट केल्यानंतरच लिंक करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल.
पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडणीबद्दल लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. पॅन आणि आधार ही दोन महत्त्वाची कार्डं लिंक करणं म्हणजे त्यांची जोडणी करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
भारतीय नागरिकाच्या बँकेशी संबंधित सर्व व्यवहारांचा या जोडणीशी संबंध आहे. पॅन-आधार लिंक करण्याची मुदत सरकारने वाढवली आहे. पण आता नवा निर्णय सरकारने जाहीर केला आहे.
प्राप्तिकर विभागाने पॅन वापरकर्त्यांना सांगितले आहे की, आयकर कायदा 1961 नुसार, सूट प्राप्त श्रेणीत न येणाऱ्या सर्व पॅनधारकांनी 31 मार्च 2023 पूर्वी आपला पॅन क्रमांक आधारशी लिंक करावा. लिंक न केल्यास 1 एप्रिल 2023 पासून आयकर कायद्याच्या कलम 139 एए अंतर्गत तुमचे पॅन रद्द केले जाईल. यानंतर पॅन कार्ड चा वापर कधीच करता येणार नाही.
आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड जोडण्यासाठी इन्कम टॅक्स विभागाने मुदतीत वाढ तर केली आहे, पण आता ही सेवा मोफत नसेल. यासाठी दंड भरावा लागेल आणि मग ही जोडणी करावी लागेल. परंतु, नागरिकांच्या मनामध्ये याविषयी गोंधळ आहे, हजारो शंका आहेत.
प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 1 जुलै 2022 पर्यंत पॅन आणि आधार लिंक करण्याची प्रक्रिया मोफत होती. यानंतर 30 जून 2022 पर्यंत पॅन युजर्सला लिंक करण्याची संधी देण्यात आली होती, पण शुल्क 500 रुपये निश्चित करण्यात आले होते. आता पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2023 पर्यंत वाढवण्यात आली असून यासाठी पॅन युजर्संना 1,000 रुपये विलंब शुल्क भरावे लागणार आहे.
पॅनशी आधार लिंक करणे का आवश्यक आहे
जर पॅन कार्ड आधारशी लिंक केलेले नसेल तर तुम्ही म्युच्युअल फंड, डिमॅट खाते, बँक खाते उघडणे यासारखी कामे करू शकणार नाही, कारण या सर्वांसाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.
आधार आणि पॅन कार्ड लिंक न केल्यामुळे पॅन कार्ड लॉक झाले असेल, तर तुम्ही अशा कोणत्याही सुविधेचा लाभ घेऊ शकणार नाही जिथे पॅन कार्ड अनिवार्य आहे. त्यामुळे जर तुम्ही अजून पॅन आणि आधार कार्ड लिंक केले नसेल तर हे काम लवकर पूर्ण करा.