करदात्याचे प्रकार आणि त्यांच्याद्वारे मिळवलेल्या उत्पन्नाचे प्रकार यावर अवलंबून असे सात प्रकारचे आयटीआर फॉर्म आहेत. आपण कोणता फॉर्म वापरावा याची माहिती जाणून घेऊया.
आयटीआर (itr) भरताना करदात्यांना नेहमी एक प्रश्न पडतो की त्यांनी कोणता फॉर्म वापरावा. सध्या करदात्याचे प्रकार आणि त्यांच्याद्वारे मिळवलेल्या उत्पन्नाचे प्रकार यावर अवलंबून असे सात प्रकारचे आयटीआर फॉर्म आहेत. आपण कोणता फॉर्म वापरावा याची माहिती जाणून घेऊया.
आयटीआर – १
आयटीआर १ हा सर्वात सोपा आयकर फॉर्म आहे. ज्यांचे एकूण वार्षिक उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. तसेच, उत्पन्नाचे स्त्रोत मासिक वेतन किंवा घर मालमत्ता किंवा व्याज आणि ५००० रुपये पर्यंतचे शेती उत्पन्न असेल तर आपल्याला आयटीआर १ फॉर्म भरावा लागेल. मात्र, हे लक्षात ठेवा की जर आपले एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि आपण भांडवली नफा कर देत असाल, तसंे-च उत्पन्न एकापेक्षा जास्त घरांच्या मालमत्तेतून आले असेल तर आपण आयटीआर १ वापरू शकत नाही. याशिवाय आपण एखाद्या कंपनीचे संचालक असल्यास किंवा परदेशात आपली मालमत्ता असल्यास आपण हा फॉर्म वापरू शकत नाही.
आयटीआर – २
हा आयटीआर फॉर्म अशा लोकांसाठी आणि अविभाजित हिंदू कुटुंबांसाठी आहे ज्यांचे व्यवसाय उत्पन्न नाही किंवा आयटीआर १ च्या कार्यक्षेत्रात येत नाहीत. भांडवली नफा, परकीय मालमत्ता आणि ५ हजार रुपयांपेक्षा जास्त शेती उत्पन्न असणाऱ्यांना आयटीआर-२ फॉर्म भरावा लागतो. आपण एखाद्या कंपनीचे वैयक्तिक गुंतवणूकदार असाल किंवा आपल्याकडे आर्थिक वर्षात असूचीबद्ध कंपनीची हिस्सेदारी असेल तर आपण हा फॉर्म वापरू शकता. मात्र, आपले उत्पन्न कोणत्याही व्यवसायातून आले तर आपण हा फॉर्म वापरू शकत नाही.
आयटीआर – ३
वैयक्तिक किंवा अविभाजित हिंदू कुटुंबे ज्यांचे उत्पन्न मालकीच्या व्यवसाय किंवा व्यवसायातून आले आहे ते आयटीआर ३ दाखल करण्यास पात्र आहेत. निवासी मालमत्ता, मासिक वेतन / व्यवसाय, भांडवली नफा किंवा इतर स्त्रोतांकडून मिळणारे उत्पन्न या फॉर्ममध्ये समाविष्ट केले जाऊ शकते. बहुतेक आयटीआर ३ पात्रता मानक आयटीआर २ प्रमाणेच आहेत.
आयटीआर – ४ (सुगम)
आयटीआर-४ अशा व्यक्तींसाठी, अविभाजित हिंदू कुटुंबे, भागीदारी कंपनीसाठी आहे ज्यांचे एकूण उत्पन्न ५० लाख रुपयांपर्यंत आहे किंवा ज्यांचा लहान व्यवसाय आहे. आयकर कायदा १९६१ च्या कलम ४४ एडी, ४४ एडीए आणि ४४ एई अंतर्गत संभाव्य उत्पन्न योजनेचा पर्याय निवडलेल्या करदात्यांना हा भरावा लागतो. मात्र, भांडवली नफ्यातील उत्पन्नाच्या बाबतीत हा फाॅर्म वापरता येणार नाही. तसेच, जर तुम्ही एखाद्या कंपनीचे संचालक असाल किंवा तुमचे एकूण उत्पन्न ५० लाखांपेक्षा जास्त असेल तर तुम्ही हा फॉर्म वापरू शकत नाही. तसेच, जर आर्थिक वर्षात कोणत्याही वेळी आपली असूचीबद्ध कंपनीत इक्विटी गुंतवणूक असेल किंवा उत्पन्न भारताबाहेरून आले असेल किंवा आपल्याकडे परकीय मालमत्ता असेल तर आपण आयटीआर-४ दाखल करण्यास पात्र नाही.
आयटीआर – ५
स्वयं-मालकी कंपन्या, मर्यादित दायित्व भागीदारी, व्यक्तींची संस्था यांना आयटीआर-५ भरावा लागतो.
आयटीआर– ६
आयकर कायदा १९६१ च्या कलम ११ अंतर्गत सूट मिळत नसलेल्या कंपन्यांना त्यांचे फॉर्म रिटर्न भरण्यासाठी या फॉर्मचा उपयोग करणे आवश्यक आहे.
आयटीआर – ७
आयकर कायदा १९६१ च्या कलम १३९ (४A), १३९ (४B), १३९ (४C) आणि १३९ (४D) मध्ये परिभाषित केलेले व्यक्ती किंवा संस्था यांना त्यांचे उत्पन्न भरण्यासाठी या फॉर्मचा वापर करणं आवश्यक आहे. राजकीय पक्ष, वृत्तसंस्था, वैज्ञानिक परतावा संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये इत्यादींचा यात समावेश आहे.