PROJECT REPORT
कृषी क्षेत्रामध्ये फळबाग लागवड, फलोद्यान, आधुनिक संरक्षित शेती आणि कृषिपूरक व्यवसायामध्ये पशुपालन, कुक्कुटपालन, शेळी-मेंढीपालन, मस्त्यपालन, मधमाशीपालन इ. व्यवसायांची सुरूवात करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता असते. त्यासाठी आपण बहुधा बँकावर अवलंबून असतो. त्यासाठी प्रकल्प अहवाल महत्त्वाचा असतो.
स्तःची बचत, पैपाहुण्यांकडून उधार उसनवारीतून छोट्या प्रकल्पांची उभारणी शक्य असली तरी मध्यम आणि थोड्या मोठ्या प्रकल्पासाठी आवश्यक एकूण भांडवलापैकी फारच अल्प गरज त्यातून पूर्ण होते. अशा वेळी आपल्याला बँका किंवा विविध वित्तीय संस्थांकडे जाण्याशिवाय पर्याय उरत नाही. बँकेकडे जाताना शेतकरी, उद्योजकाच्या मनात अनेक प्रश्न असतात. उदा. कोणती बँक आपणास कर्ज देईल, बँकेची निवड कोणत्या निकषावर करायची, किती कर्ज देणार, व्याजाचा दर काय असेल, आणि कर्जासाठी तारण काय द्यावे लागेल, कर्जाची परतफेडीच्या अटी, शासकीय योजना व अनुदान आहे का, असे अनेक प्रश्न आणि शंका मनात असतात. कोणत्याही बॅंकेमध्ये आपण कर्ज मागणीसाठी विचारणा करतो, त्या वेळी त्यांची पहिली मागणी असते ती प्रकल्प अहवालाची. आपण करणार असलेल्या व्यवसायासंबंधित समग्र माहिती प्रकल्प अहवालात असते.
प्रकल्प अहवाल म्हणजेच प्रकल्पाचा तांत्रिक, शास्त्रीय, व्यावहारिक, व्यवस्थापनात्मक आणि आर्थिक असे सर्वंकष चित्र दाखविणारा दस्तऐवज. या अहवालामध्ये संभावित व्यवसायाचा आराखडा मांडलेला असतो. या लिखित दस्तऐवजामध्ये प्रकल्पाच्या तांत्रिक व आर्थिक बाबींबरोबरच प्रकल्पाच्या व्यवस्थापनातील मूलभूत बाबींचाही समावेश करणे आवश्यक असते. त्यामुळे स्वतः व्यवसाय करणाऱ्या व्यक्तीलाही प्रकल्पाची संपूर्ण कल्पना येते. बँकेलाही एकूण प्रकल्पाचा अंदाज मिळण्यास मदत होते. सर्व बाबी मुद्देसूद मांडलेल्या असल्यामुळे बॅंकेकडून कर्ज मिळणे तुलनेने सोईस्कर होते.
- प्रकल्पाची जागा
- प्रकल्पासाठी आवश्यक इमारत, शेड, यांत्रिक सामग्री, कार्यालय इ.
- प्रकल्पानुसार खरेदी करावयाच्या बाबी. (उदा. दुग्ध व्यवसायासाठी गाई, म्हशी, कुक्कुटपालनासाठी कोंबडीची एक दिवसाची पिले, किंवा अंडी देण्यास तयार असलेल्या कोंबड्या (Pullet) इ.
- आर्थिक बाबी -वर्षासाठी लागणारे खेळते भांडवल, व्यवसायातून मिळणारे उत्पन्न, व्यवसायातून होणारा नफा, खर्च व उत्पन्न यांचे गुणोत्तर, बँकेच्या कर्जाच्या परतफेडीचे तपशील याचा समावेश असतो.
- तांत्रिक बाबींसाठी स्वतः योग्य ते प्रशिक्षण घेतलेले असल्यास फायदा होतो. तुमचा या व्यवसायाशी संबंधित अनुभव असल्यास त्याचा फायदा होतो. बॅंक कर्ज देतेवेळी अशा लोकांना प्राधान्य देते.
तांत्रिक व्यवहार्यता आणि आर्थिक सबलता –
तांत्रिक व्यवहार्यता – प्रकल्प अहवालामध्ये नमूद केलेल्या बाबींमधून प्रकल्प हा तांत्रिक दृष्ट्या योग्य आहे की नाही, याची शहानिशा करता येते. त्या वेळी प्रकल्प अहवालासोबत जोडलेल्या विविध कागदपत्रांची तपासणी केली जाते. तांत्रिक बाबींची तपासणी करण्यासाठी बॅंकेत कृषिविषयक शिक्षण झालेले, ज्ञान असलेले कृषी अधिकारी असतात. त्यांनाही काही शंका असल्यास आवश्यकता वाटल्यास त्या क्षेत्रातील तज्ज्ञ आणि अनुभवी लोकांकडून सल्ला घेऊ शकतात. त्यामुळे तांत्रिक बाबी या अत्यंत अचूक असतील, याची खात्री करावी. कारण त्यावरून प्रकल्पाची तांत्रिक व्यवहार्यता तपासली जाते.
आर्थिक सबलता –
प्रकल्प आर्थिकदृष्ट्या सबल आहे का, हेपाहण्यासाठी प्रकल्पाचा खर्च व उत्पन्न यांचा ताळेबंद महत्त्वाचा असतो. तसेच त्यातून मिळणारे उत्पन्न व होणारा खर्च यांचे गुणोत्तर (BC Ratio) व परतीचा अंतर्गत दर (IRR – Internal Rate of Return) अशा काही मुद्द्यावरून प्रकल्पाची आर्थिक सबलता पाहिली जाते. यातील काही महत्त्वाच्या बाबी आपण जाणून घेऊ.
उत्पन्न व खर्च यांचे गुणोत्तर (BC Ratio)
उत्पन्न व खर्च यांचे गुणोत्तर हे १ पेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. हे गुणोत्तर १: १ असल्यास प्रकल्पाचा खर्च व उत्पन्न हे सारखेच असते. त्यातून फायदा होणे शक्य नाही. म्हणजेच असा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या योग्य होत नाही. नेहमी प्रकल्पामध्ये होणाऱ्या सर्व खर्चांपेक्षा उत्पन्न जास्त असले पाहिजे. म्हणजेच उत्पन्न व खर्च यांचे गुणोत्तर १ पेक्षा जास्त असावे लागते.
भारतासारख्या विकसनशील देशासाठी १५% सवलत घटक हा मानदंड ठरवला आहे. त्यामुळे कृषी प्रकल्पामध्ये खर्च व उत्पन्न यांचे गुणोत्तर काढताना १५% सवलत घटकाने खर्च व उत्पन्न यांचे आजचे मूल्य काढले जाते. त्यानुसार खर्च व उत्पन्न यांचे गुणोत्तर काढले जाते.
उत्पन्न व खर्च यांचे गुणोत्तर काय दर्शविते?
- उत्पन्न व खर्च यांच्या गुणोत्तरातून सापेक्ष खर्च व अपेक्षित उत्पन्न यांचा संबंध स्पष्ट होते.
- प्रकल्पामध्ये उत्पन्न व खर्च यांचे गुणोत्तर हे १ पेक्षा जास्त असते, त्या वेळी प्रकल्पामध्ये गुंतवलेल्या रकमेमधून फायदा होऊ शकतो.
- प्रकल्पामध्ये उत्पन्न व खर्च यांचे गुणोत्तर हे १ पेक्षा कमी असते, त्या वेळी प्रकल्पामध्ये गुंतवलेल्या रकमेमधून फायदा होऊ शकत नाही. अशा सादर प्रकल्पाला बॅंक कर्जपुरवठा करू शकत नाही.
- दरातील चढउतार किंवा अन्य काही कारणामुळे प्रकल्पातील उत्पन्न व खर्च गुणोत्तर काही वेळेस १ पेक्षा जास्त, तर काही वेळेस १ पेक्षा कमी दिसत असल्यास त्यातून त्या प्रकल्पाचे खरे चित्र स्पष्ट होऊ शकत नाही. मग अशा प्रकल्पांसाठी अन्य निकष (उदा. आय.आर.आर. सारखे गुणोत्तर) तपासावे लागतात.
प्रकल्प तयार करताना महत्त्वाच्या काही बाबी –
प्रकल्प तयार करताना बँकेच्या कर्जासंबंधीच्या अनेक बाबींचा विचार करावा लागतो. उदा. कर्जाची रक्कम, कर्जदाराचे स्वत:चे भांडवल, कर्जाच्या परतफेडीचा कालावधी, व्याजाचा दर इ.
कर्जाची रक्कम व कर्जदाराचे स्वत:चे भांडवल –
- प्रकल्प किंमत रु. १,६०,००० साठी बँक १००% कर्ज. यासाठी स्वत:ची रक्कम काही नाही.
- रु. १,६०,००० वरील प्रकल्प रकमेच्या ८५% ते ७५% कर्ज मंजूर केले जाते. उर्वरित १५% ते २५% रक्कम ही कर्जदाराला स्वत:ला उभी करावी लागते.
कर्जाच्या परत फेडीचा कालावधी –
कृषी कर्जाचे परतफेडीच्या कालावधीनुसार तीन प्रकार पडतात.
- अल्प मुदत कर्ज – परतफेडीचा कालावधी तीन वर्षापर्यंत. हा कालावधी सर्व साधारणपणे पीककर्जासाठी असतो.
- मध्यम मुदत कर्ज – परतफेडीचा कालावधी तीन वर्षांपासून ते नऊ वर्षांपर्यंत.
- दीर्घ मुदत कर्ज – परतफेडीचा कालावधी नऊ वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंत